जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे दूत सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि स्वत: खा. रावसाहेब दानवे यांनी आज सकाळी अर्जुन खोतकर यांची त्यांच्या दर्शना निवास्थानी भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. खोतकरांनी सहकारमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेत याबाबतचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोपविल्याने दानवे-खोतकर यांच्या दिलजमाईचा प्रयत्न निर्णयाविना राहिला.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि खा. रावसाहेब दानवे या दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीपासून तेढ निर्माण झाली आहे. या दोन्हीमधील मतभेद अत्यंत टोकाला गेले आहेत. भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी आपण लोकसभेचे मैदान सोडलेले नाही, असे वक्तव्य करून खोतकरांनी खा. दानवेंना कोंडीत पकडले आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविली. मंत्री देशमुख हे आज सकाळी खा. दानवेंना सोबत घेऊन अर्जुन खोतकरांकडे गेले. तेथे दोन तास चर्चा झाली. चर्चेनंतर सहकारमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले, तर खोतकर यांनी आपली देशमुख यांच्याशी चर्चा झाली. या प्रक़रणी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आपणास मान्य असेल, असे खोतकर यांनी स्पष्ट केले. खोतकर गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत आहेत. काँग्रेस पक्षानेही खोतकरांना उमेदवारीचे आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे खा. दानवे गटात अस्वस्थता पसरली आहे. ही अस्वस्थता दूर करण्यासाठी आलेल्या सहकारमंत्र्यांना मात्र निर्णयाविना परतावे लागले.